श्री सप्तकोटीश्वर मंदिराचा ज्ञात इतिहास मागील शतकातील आहे. मुंबई हे सात बेटे मिळून बनलेले समुद्रकिनार्‍यावरील नयनरम्य असे ठिकाण होते. त्यातील दक्षिणेकडील शेवटचे बेट म्हणजे माहिम. हा भाग नारळाच्या बागा व इतर वनश्रीने नटलेला होता. मुख्यत्वेकरुन येथे कोळी समाजाची वस्ती होती. त्यावेळी सगळीकडे वेगवेगळ्या वाड्यांमध्ये लोक राहत होते. तसेच वस्तीसुद्धा फारच तुरळक होती.

अंदाजे इ.स. १९२५ च्या सुमारास होळी उत्सवाच्या निमित्ताने मंदिराच्या सद्य जागी खणत असताना येथील रहिवाश्यांना एक स्वयंभू शिवलिंग सापडले. येथील नागरिकांनी मोठ्या मनोभावे फळ्यांचे ४" X  ४"  आकाराचे मंदिर त्याच ठिकाणी उभे केले. या छोट्याश्या मंदिरात रोजची पूजा उत्साहाने सुरु झाली.

सुरुवातीला शिवलिंगाचा आकार फार लहान होता. पण पुढे पुढे काही वर्षांनी शिवलिंगाचा आकार वाढत गेला. लवकरच या गोष्टीची किर्ती सर्वदूर पसरली व हा दैवी चमत्कार पहाण्यासाठी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढू लागली.

साधारण १९४२ च्या सुमारास मंदिराचा आकार वाढविण्यात आला व ते मोठे करण्यात आले. तसेच स्थानिक रहिवाशीदेखिल या सगळ्या गोष्टींत मोठ्या उत्साहाने भाग घेऊ लागले. १९५३ साली मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चा करण्यासाठी गुरुजींची नेमणूक करण्यात आली.

त्याच सुमारास एक ब्राम्हण गृहस्थ मंदिरात दर्शनासाठी आले होते. हे गृहस्थ गोवा राज्यातील नार्वेस्थित श्री सप्तकोटीश्वर मंदिराचे पुजारी होते. त्यांनी शिवलिंगाचे दर्शन घेताच आश्चर्य व्यक्त करीत असे सांगितले की, या मंदिरातील शिवलिंग हुबेहूब नार्वेस्थित श्री सप्तकोटीश्वर शिवलिंगाची प्रतिकृती आहे व हा साक्षात श्री सप्तकोटीश्वरच आहे. त्या दिवसापासून या मंदिराचे नामकरण "श्री सप्तकोटीश्वर मंदिर" असे झाले.

श्री सप्तकोटीश्वराचा इतिहास असा सांगितला जातो की, पुराणकाळी अगस्ती मूनी "ॐ नमः शिवाय" चा जप सात  कोटीवेळा करण्यासाठी गोव्याला एका मंदिरात गेले. त्यांनी तो जप सात कोटी वेळा पूर्णही केला. तेव्हापासून त्या ठिकाणाचे (देवस्थानाचे) नाव "श्री सप्तकोटीश्वर" असे पडले.

माहिम येथील श्री सप्तकोटीश्वर मंदिरात सालाबादप्रामाणे प्रत्येक श्रावणी सोमवारी उत्सव साजरा केला जातो. यावेळेस भजन व किर्तनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच गुढीपाडवा, तुलसी विवाह इत्यादी उत्सवही उत्साहाने साजरे केले जातात. या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव महाशिवरात्रीच्या निमित्ताने जोरात साजरा होतो. जवळचेच नव्हे तर दूरदूरहून आलेले भाविक मोठ्या संख्येने यात सहभागी होतात.

या मंदिराच्या "श्री सप्तकोटीश्वर सेवा मंडळ" या विश्वस्त मंडळाची नोंदणी दिनांक ९ सप्टेंबर २०१४ रोजी झाली. त्याचा नोंदणी क्रमांक 'महाराष्ट्र राज्य, मुंबई १७१३/२०१४ जी.बी.बी.एस.डी.' असा आहे.

 
 
श्री सप्तकोटीश्वर मंदिर © २०१७ सर्व अधिकार राखिव